बीड – येथील एका महिला आयपीएस अधिकाऱ्याचा दलित विरोधी वक्तव्याचा व्हिडिओ समोर आला आहे. आपल्या अधिकारांचा गैरवापर करणारे वक्तव्य असलेल्या या व्हिडिओमुळे संपूर्ण मराठवाड्यात संतापाची लाट निर्माण झाली आहे. माजलगाव येथील आयपीएस अधिकारी भाग्यश्री नवटके या मी २१ दलितांना फोडले असल्याचे सांगताना दिसतात. नवटके यांच्या दलित-मुस्लिम विरोधी वक्तव्याचा व्हिडिओ समोर आल्यानंतर त्यांच्यावर अॅट्रॉसिटी अंतर्गत गुन्हा दाखल करण्याच्या मागणीने जोर धरला आहे.
काय आहे व्हिडिओमध्ये
आयपीएस अधिकारी भाग्यश्री
नवटके या मराठा समाजातील काही लोकांसोबत बोलतानाचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे. या
व्हिडिओमध्ये त्या म्हणतात, की ‘मी तुला फक्त पाठीवर ४-५ फटके मारले, पण तुला माहित आहे का,
दलितांना आम्ही कसे मारतो. दलितांना हात-पाय बांधून मारते मी. सगळा अॅट्रॉसिटीचा राग त्यांच्यावर काढते. तुम्हाला माहित आहे का २१ दलितांना आम्ही कसे
फोडले.’
काय आहे प्रकरण
माजलगाव येथील पोलिस
उपअधीक्षक भाग्यश्री नवटके यांच्याकडे मराठा समाजातील काही लोकांवर गुन्हे दाखल
झाले म्हणून मदत मागण्यासाठी ते आले होते. यावेळी त्यांनी, ‘अजून तुमच्यावर गुन्हे दाखल
केले नाही. पण तिथे दुसरे पोलिस असल्यामुळे मला काही करता आले नाही. नाही तर
त्यांनी म्हटले असते की मी मराठा आहे म्हणून तुमची बाजू घेते. तुला काही जास्त मारले
नाही. तुला माहित नाही आम्ही दलितांना कसे हाय-पाय बांधून मारतो.’ असे वक्तव्य असलेला
भाग्यश्री नवटकेंचा व्हिडिओ समोर आला आहे.
त्या म्हणतात, ‘दलितांना आम्ही कसे मारतो
माहित आहे का? त्यांना पाय बांधून
आणि हात बांधून मारतो यार... सगळा अट्रॉसिटीचा राग त्यांच्यावर काढलेला आहे. उलट
याला सोडलं काल. घरी जाऊन झोप म्हटले.’
अॅट्रॉसिटी दाखल करुन सेवेतून बडतर्फ करण्याची मागणी
आयपीएस अधिकारी भाग्यश्री
नवटके यांच्यावर अॅट्रॉसिटी अंतर्गत गुन्हा दाखल
करण्याची मागणी बहुजन विकास मोर्चाचे अध्यक्ष बाबुराव पोटभरे यांनी केली आहे. दलित
संघटनांच्या तक्रारीनंतर बीडचे पोलिस अधीक्षक श्रीधर गोविंदराजन यांनी नवटके
यांच्या चौकशीचे आदेश दिले असल्याची माहिती आहे. दलित विरोधी वक्तव्य करणाऱ्या नवटके
यांच्यावर अॅट्रॉसिटी अंतर्गत गुन्हा दाखल केला
नाही तर कोर्टात जाण्याचा इशारा पोटभरे यांनी दिला आहे.
















